पर्यांच्या राज्यात
आहे एक शाळा
शाळेमध्ये पर्या
होतात गोळा !
पर्यांची रीत
काय तरी बाई
फुलाची दौत
मधाची शाई !
पानाच्या पाटीवर
लिहितात गाणी
गाणी लिहायला
परागाची लेखणी !
पर्यांना नाही
गणिताचा जाच
पानाफुलांवर
करतात नाच !
गंधर्व शिकवतो
गोड गोड गाणी
गोष्टी सांगायला
शिकवते राणी !
फुलांना कसे
द्यावेत रंग
मुलांना कसे
करावे दंग
स्वप्नाचे जाळे
कसे विणावे
हळू हळू फूल
कसे उमलावे
पर्यांच्या शाळेत
विषय किती छान
डोक्याला नाही
मुळी काही ताण !
अश्शी शाळा
असावी बाई
कुण्णी नापास
होणार नाही !
Nice poem...
ReplyDeleteNice !
ReplyDelete