Sunday, May 15, 2011

परीचा पराक्रम


एकदा परीने
घातली नथ
नथीला लावून
ओढला रथ !
कौतुकाने तिला
अस्मान झाले थोडे :
पण खट्याळ राणी
म्हणाली काय :
" छान सोय
झाली बाय !
नक्को आता                                       
रथाला घोडे !"






 



Sunday, February 6, 2011

विदूषक

विदूषकाला
येतो खोकला
म्हणतो ' मला
धरून बुकला !'

विदूषकाला
येतो ताप
म्हणतो 'गळ्यात
घाला साप !'

विदूषकाला
होते सर्दी :

'तोफखान्यात
द्या वर्दी;
नष्ट करीन
शत्रूंची गर्दी !'


Sunday, January 16, 2011

मोरपीस

मराठीच्या पुस्तकात ठेवलं मी मोरपीस
रात्री त्याचा मोरच झाला - नाचत येऊन
मला म्हणाला, " इतक्या लवकर झोपलीस?
बाहेर बघ, सुरेख पावसाची रूणझुण -"

खरोखरच, पडत होते आभाळ धाय धाय
पावसाच्या  सरीनं जागी झाले अन् काय,
पुस्तक  होते उघडे - आणि मोरपीस आतून
हसत होते प्रसन्नतेने माझ्याकडे बघून -