Saturday, December 18, 2010

पर्‍यांचे डॉक्टर



पर्‍यांचे डॉक्टर
फारच छान
सगळ्या रोगांवर
एकाच निदान :

" फुला-फुलांत
हिरवळीवर
करा नाच
म्हणा गाणी !

फुला-फुलांतील
मध चाखून
वरती प्या
दवाचे पाणी !"

पर्‍यांचे डॉक्टर
फारच छान
सगळ्या रोगांवर
एकाच निदान !

 

Sunday, December 5, 2010

पर्‍यांची राणी


पर्‍यांची राणी
पिऊन स्वर
वरती खाते
शब्दांचे गर

पर्‍यांची राणी
असे करतेन
तिचे गाणे
गोड होते !

Saturday, November 27, 2010

राजूचे पतंग

राजूचे पतंग
उंच उंच जातात
आभाळात चांदण्या
होउन बसतात !

राजूचे पतंग
पाण्यात पडतात
होड्या होउन
वाहून जातात !

 राजूचे पतंग
झाडावर बसतात
पाखरे होउन
उडून जातात !

राजूचे पतंग
जेव्हा कटतात
तेव्हा पर्‍या
झेलून घेतात !

Sunday, November 21, 2010

जंटलमन



जंटलमन व्हायचे
सिंहाने ठरवले :
टूथपेस्टने
दात घासले !

अंगात घालून
वुलनचा कोट
खिशात ठेवली
शंभराची नोट !

चटयापट्यांची
पॆन्ट घातली
वरती छान
टाय बांधली !

स्वत:वरच
खूष होऊन
एक माणूस
टाकला खाऊन !

Friday, November 19, 2010

कोडे


चांदोबा भेटतो
पुण्याला
चांदोबा भेटतो
मुंबईला -


चांदोबा भेटतो
कर्‍हाडला
चांदोबा भेटतो
र्‍हाडला -

माझ्यामागे
नेहमी येतोस
चांदोबा,कुठे
तिकीट घेतोस?


 

Sunday, November 14, 2010

पाहुणे


घरापुढे
थांबला टांगा
पाहुणे कोण
आले सांगा !

मावशी न आत्या
मामा न काका
सगळेच आले
साधून मोका !

एवढे पाहुणे
कशासाठी?
अहो बाळाच्या
बारशासाठी !


घरापुढे
थांबला टांगा
पाहुणे कोण
आले सांगा !

म्हातारा म्हातारी
हलवती मान
सुटबुटवाल्याची
वेगळीच शान !

एवढे पाहुणे
कशासाठी ?
अहो ताईला
बघण्यासाठी !

घरापुढे
थांबला टांगा
पाहुणे कोण
आले सांगा !

एक विदुषक
एक ससा
दोन पर्‍या
खर्‍या खर्‍या !

एवढे पाहुणे
कशासाठी ?
राजूशी स्वप्नात
खेळण्यासाठी !

पर्‍यांची शाळा

पर्‍यांच्या राज्यात
आहे एक शाळा
शाळेमध्ये पर्‍या
होतात गोळा !

पर्‍यांची रीत
काय तरी बाई
फुलाची दौत
मधाची शाई !

पानाच्या पाटीवर
लिहितात गाणी
गाणी लिहायला
परागाची लेखणी !

पर्‍यांना नाही
गणिताचा जाच
पानाफुलांवर
करतात नाच !

गंधर्व शिकवतो
गोड गोड गाणी
गोष्टी सांगायला
शिकवते राणी !

फुलांना कसे
द्यावेत रंग
मुलांना कसे
करावे दंग

स्वप्नाचे जाळे
कसे विणावे
हळू हळू फूल
कसे उमलावे

पर्‍यांच्या शाळेत
विषय किती छान
डोक्याला नाही
मुळी काही ताण !

अश्शी शाळा
असावी बाई
कुण्णी नापास
होणार नाही !

पर्‍यांची शाळा


"पर्‍यांची शाळा " हे माझे बाबा सुभाष वसेकर यांचे १९७८ साली बाल-साहित्यासाठीचा राज्य-पुरस्कार मिळालेले पुस्तक. या पुस्तकातील काही निवडक कविता येथे देण्यात येतील. या पुस्तकातील काही कविता बालभारती तसेच इतर पाठ्य-पुस्तकात याआधी समाविष्ट झाल्या आहेत.